Baithak Foundation believes that music exposure and education are as important as mainstream education.

Since 2016, we are working towards creating a society with equitable music access and learning opportunities for children from the most marginalised communities.

कुमारस्मृती पुष्प ३

गणपतराव कात्रे यांच्याकडे कुमार उतरत असत त्या कालखंडात अहमदनगर येथे झालेल्या दोन मैफिली चिरस्मरणीय झाल्या. त्यांची आठवण बुजणे कदापि शक्य नाही. एकदा संध्याकाळी असाच मी गाण्याची शिकवणी घेत होतो, तितक्यात खालून रस्त्यावरून मला हाक आली म्हणून मी खाली गेलो. रस्त्यावर गणपतराव व कुमार मला हाका मारीत होते. कुमारांना कपड्यांचा भारी शौक. गॅबार्डीनची सूटपॅन्ट घालून कुमार आलेले होते. दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घालून त्यांची बोलण्याची लकब अजून मला आठवते.

“उद्या आपल्याला नगरला जायचे आहे – तुम्ही, मी व लालजी. तिघांची रिझर्वेशन्स काढून आणा” असे सांगून कुमारांनी पैसे दिले. दुसऱ्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे नगरला मोटारीने गेलो व कापडबाजारात आमच्यासाठी नियोजित केलेल्या ठिकाणी उतरलो. त्या दिवशी गाणे अमेरिकन मिशन हायस्कूलच्या गावातल्याच हॉलमध्ये होते. कुमारांचे नगरला हे पहिले गाणे होते. हॉल तुडुंब भरला होता. सर्व रसिक श्रोते त्या दिवशी जमले होते. सुरुवातीचा यमनचा ख्याल खूप जमून कुमार गायले त्या नंतर ‘किनारे किनारे’ ही द्रुत चीज म्हटली. त्यानंतर ‘धूम मचाई’ ही काफी रागातील ठुमरी म्हटली. कुमारांची गायकी नगरातील रसिकांना अपरिचित होती, पण आपण काहीतरी दिव्य गाणे ऐकल्याचा आनंद मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. माझ्याशी परिचित असलेले डॉ. रानडे, छगन बोगावात, पंडित भावे, श्रीधर आपटे, मंगला आपटे, बेंद्रे, इत्यादिकांचे चेहरे मला उत्फुल्ल झालेले दिसत होते. पण कुमार नको इतक्या जोशाने गात आहेत असे मला वाटले आणि लवकरच त्यांचा आवाज बसत चाललेला मला वाटला; व लगेच कुमारांनी मध्यंतर घेतले. पुढे कसे होणार ही काळजी मी कुमारांपुढे व्यक्त केली. पण कुमार म्हणाले, “तुम्ही घाबरू नका, याच्यावरही माझ्याजवळ इलाज आहे.”

मध्यंतरानंतर ‘मध्यम’चे तंबोरे जुळवले आणि श्रोते जाग्यावर येऊन बसत नाहीत तोच कुमारांनी चंद्रकंसाचा आरोह घेऊन निषादावर थांबून ‘येरी पिया’ ही चीज सुरु केली. बैठकीचा रंग विसकटतो आहे असे वाटले की फिरतीची तान घेऊन दाणकन समेवर येऊन श्रोत्यांना चकित करण्याचे कुमारांचे कसब काही औरच आहे. उत्तरेकडील सगळ्या कॉन्फरन्समध्ये कुमार याच तंत्राचा अवलंब करून आपला प्रभाव श्रोत्यांवर पाडीत हे मला अनेक ठिकाणी कळले आहे. चंद्रकंसाने कुमारांच्या बैठकीला एक आगळेच स्वरूप प्राप्त झाले. बैठक ताब्यात आलीसे दिसताच, चंद्रकंस संपताच कुमारांनी पंचम रागातील ‘आवो गावो, गावो रिझाओ’ ही चीज सुरु केली. त्या चीजेला मात्र लोकांनी डोक्यावर घेतले. त्या चीजेतील अंतऱ्यामधील ‘नित नई नई उपज की फिरत’ यातील लडिवाळ जागा घेताना तर भिंतीजवळ बसलेले मागील श्रोते उभे राहून जणू काही नृत्य करू लागलेले मला दिसले. कुमारांची आतषबाजी ही इथेच थांबणारी नव्हती. ती चीज त्रितालामध्ये होती, पण कुमारांनी ती चीज संपत नाही तोच ती चीज द्रुत एकताल, झपताल, रूपक, आडाचौताल अशी एकंदर पाच तालांत चपखलपणे म्हणून दाखवली व ही चीज मूळ कोणत्या तालात असावी असा श्रोत्यांना सवाल केला. शेवटी कुमारांनी ‘नींदिया आई रे’ ही भैरवी म्हणून श्रोत्यांना भैरवीचा अननुभूत आनंद दिला.

रस्त्याने परत जाताना अनेक श्रोते ही चीज गुणगुणत घराकडे जाताना मी ऐकले. त्या दिवशी अध्यक्ष म्हणून डॉ. रानडे जे बोलले त्यातील एक वाक्य माझ्या चांगल्या स्मरणात आहे. ते म्हणाले, “नगरच्या इतिहासात असा गाण्याचा कार्यक्रम झाला नसेल व पुन्हा होईल असे मला वाटत नाही.” त्यांचा आनंद त्यांनी ज्या शब्दांत व्यक्त केला त्यातच कुमारांची खरी महती आहे.

अमेरिकन मिशन हॉलमधील कार्यक्रमाने नगरकर बेचैन झाले आणि कुमारांचा कार्यक्रम नगरला पुन्हा कसा घडवून आणता येईल या विचाराला लागले. माझे स्नेही श्री. बेंद्रे, गुणे वैद्य इ. मंडळींनी माझ्यामार्फत कुमारांची भेट घेऊन कार्यक्रम करण्याचे ठरवले. नगरची आयुर्वेदाश्रम संस्था म्हणजे नगरचे वैभव समजले जाते. तेथे गणपती उत्सव फार मोठ्या थाटाने साजरा होत असे. उत्सवात एक तरी मोठा गाण्याचा कार्यक्रम होई. तो कार्यक्रम कुमारांचा करावा असा सर्वांनी बेत केला. त्या प्रमाणे प्रमुख मंडळी मुंबईला जाऊन कार्यक्रम ठरवून आली. मला पुण्याला त्या मंडळींनी कळवले व माझ्या उपस्थितीचा आग्रह धरला. ह्या वेळेला कुमारांना ह्या मंडळींनी सगळी साथ मुंबईहून तुमच्या सवयीची आणा म्हणून सांगितले होते. त्यामुळे हार्मोनिअमची साथ करण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती. कार्यक्रम शनिवारीच ठेवला होता. कोणताही कार्यक्रम ज्या गावी ठरला असेल, त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ऐन वेळी धावत पळत जाऊन स्टेजवर जाऊन कार्यक्रम करणे कुमारांच्या वृत्तीला कधीच मानवत नाही. एक दिवस अगोदर त्या ठिकाणी जाऊन तेथील वातावरणाशी समरस होऊन जाणे ही कार्यक्रमाच्या दृष्टीने किती औचित्यपूर्ण योजना आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन आपल्याला पाहिजे तसे स्टेज करून घेणे, कार्यक्रमाच्या वेळी दक्षिणेकडे तोंड होत नाही ना हे पाहणे, हॉल बंदिस्त आहे की नाही हे पाहणे अगत्याचे आहे. दिशा बरोबर समजण्यासाठी होकायंत्रही कुमारांच्या पोतडीत असते. अगोदर गेले म्हणजे लोकांच्या आवडीनिवडीही अजमावता येतात. कुमारांच्या सर्वच गोष्टीत योजनाबद्ध आखणी जिकडे-तिकडे दिसून येते.

ठरल्याप्रमाणे कुमार आपल्या ८-१० मित्रमंडळींसह शुक्रवारी रात्रीच नगरला आयुर्वेदाश्रमाच्या गेस्ट हाऊसमध्ये दाखल झाले. शनिवारी मी सकाळची शाळा आटोपून दुपारच्या मोटारने नगरला गेलो. त्या दिवशी दुपारी नगरला अतिशय पाऊस पडला. कार्यक्रम होतो की नाही याबद्दल मला शंका होती, कारण कार्यक्रम खास घातलेल्या मांडवात होता व मांडवात चिखलच चिखल झाला होता. पाऊस संध्यकाळी थांबला व आयुर्वेदाश्रमाच्या लोकांनी चिखल काढून वर काथ्या टाकून बैठक सुसज्ज केली. कार्यक्रम ठरल्या वेळेला सुरु झाला. गर्दी तुफान झाली होती.

मांडवाच्या बाहेर चिखल असूनही लोक चिखलात गाणे ऐकण्यास उभे होते. आयुर्वेदाश्रमातील मजूर मंडळी ही दाटीवाटीने उभी राहून माना डोलावत होती. त्या दिवशी कुमारांनी जयजयवंती रागाच्या ‘माथे जड चंदा’ या ख्यालाला सुरुवात केली. लोकांना नेहमी ‘लहरी अशा’ ह्या नाटकातील प्रसिद्ध चिजेच्या तोंडावळ्यावरून जयजयवंती राग ओळखण्याची सवय झालेली.

‘सा ऽ ध नि रे ऽ’ हे तोंड आले की त्याला जयजयवंती म्हणायचे एवढे लोकांना माहीत. पण कुमारांच्या जयजयवंती मध्ये ‘सा ऽ ध नि प रे ऽ’ अशी स्वरसंगती येत असल्यामुळे तो राग जयजयवंती आहे असे लोकांना वाटेना. वास्तविक त्या रागाचे खरे स्वरूप पहिले तर ‘प रे ऽ’ हीच स्वरसंगती त्यात प्रमुख आहे. कुमारांच्या गायकीत नेहमी ते रागाच्या मूळ गाभ्यालाच हात घालतात व लोकांना संदेहात पाडतात. ‘ध नि रे ऽ’ ही संगती दिसेना पण कानाला तर ‘ध नि प रे ऽ’ ही संगती फारच आकर्षक वाटू लागली. त्या दिवशी तबल्याच्या साथीला बसवण्णा भेंडीगिरी हा होता. हाताला वजन छान, लय उत्कृष्ट. पण वाजवताना वर आकाशाकडे पाहून चमत्कारिक मुद्राभिनय करून तो वाजवी, त्यामुळे लोकांच्या विनोदाचा तो एक विषय झाला होता. पण त्याच्या साथीच्या कसबामुळे त्याला लोक वाहवा देत होते. कुमारांनी जयजयवंती रागाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच त्या दिवशी पालटून टाकला. ‘माथे जड चंदा’ या ख्यालाच्या बंदिशीमध्येच त्या रागाचे मूळ स्वरूप फार स्पष्ट रीतीने प्रतीत झाले आहे. ही जयजयवंती मधील बंदिश मी कुमारांकडून घेतली व मीही अनेक जणांना शिकवली. ज्या ज्या वेळी मी जयजयवंती गाऊ इच्छितो त्या त्या वेळी ही बंदिश गायल्याशिवाय माझे समाधानच होत नाही. ख्यालानंतर कुमारांनी जयजयवंती वर आधारलेले ‘मोरे मन की बतिया’ हे एक कॉम्पोझीशन म्हटले. त्यातील शब्द आणि स्वर अशा काही सुंदर लयीमध्ये गुंफलेले आहेत की सामान्य श्रोताही त्यामध्ये रस घेऊ शकतो. कुमारांच्या त्या दिवशीच्या मैफलीमध्ये एक विशेष गोष्ट आढळली म्हणजे, प्रथमच त्यांच्याकडून ‘दे हाता शरणागता’ हे नाट्यगीत ऐकायला मिळाले. हे नाट्यगीत अनेक लोकांनी गायलेले आहे पण कुमारांच्या ह्या नाट्यगीतात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी दाखवले. कोणाचेही अनुकरण त्यात दिसून येत नव्हते. वास्तविक कुमार हे अस्सल नकलाकार म्हणून बालवयात प्रसिद्धीस आलेले, पण संयम एवढा की त्या दिवशी एकही जागा दुसऱ्या गायकांची म्हणून येत नव्हती. ‘दे हाता’ मध्ये त्यांनी एक ‘सरगम’ तर इतकी उत्कृष्ट टाकली की लोकांचा टाळ्यांचा कडकडाट किती तरी वेळ थांबतच नव्हता. मी स्टेज जवळच ऐकण्यासाठी बसलो होतो. त्या दिवशी कुमारांच्या पेटीच्या साथीला श्री. नागेश मसुते होते. कार्यक्रम चालू असतानाच कुमारांनी मला स्टेजवर बोलावून पेटीच्या साथीला बसवले व नागेश मसुते यांस म्हटले ‘साथ कशी असावी ते जरा ऐक’.

मी साथीला बसलेले बघताच लोकांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट केला. कोणतीही बारीक-सारीक गोष्ट कुमारांच्या नजरेतून सुटत नाही. वास्तविक मी काही महान कलाकार नव्हतो, पण आवर्जून पुण्याहून श्रोता म्हणून आलो होतो याचे महत्व ओळखून व माझ्याविषयीचा भाव व्यक्त करण्यासाठीच कुमारांनी मला साथीला बसवले. त्यात कुणाचाही अधिक्षेप करण्याचा भाव नव्हता. त्या दिवशी कुमारांनी बागेश्री मधील ‘गूंधे लावो री मालनिया’ ही त्रितालमधील चीज गाऊन तर तानांचा अक्षरशः पाऊस पाडला. या चीजेची बंदिशच खूप मोठी आहे व इतकी रेखीव आहे की नुसती अस्थायी-अंतरा जरी दोनदा म्हटला तरी रागाची तृप्तता येते. या चीजेच्या अंतऱ्यामधील ‘लगन मोरी लाग रही’ ही ओळ तर कुमारांनी इतक्या नखरेलपणाने व लयीच्या विविध अंगाने नटवली की, असे वाटले की चिजेतील हा चरण संपूच नये.

नगरला गाजलेल्या ह्या दोन मैफिली कितीतरी दिवस तेथील रसिकांच्या कौतुकाचा विषय होऊन राहिल्या. मी ज्या ज्या वेळी नगरला सुट्टीत जाई त्या त्या वेळी आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र जमलो की हाच विषय निघे आणि त्या बैठकीत कुमारांच्या चीजा म्हणून दाखवण्याचा आग्रह होई. मीही माझ्या कुवतीप्रमाणे त्यांना त्या चीजा म्हणून दाखवी. पुण्याला शाळा, शिकवण्या यांमुळे स्वास्थ्य नसे. ते मला नगरला लाभे. आणि मग त्या तीन-चार दिवसांच्या मुक्कामात दिल्ली दरवाज्या जवळ असलेल्या श्री. भावे यांच्या माडीत रसिकांच्या उपस्थितीत माझा गाण्याचा रियाझ व कुमारांच्या चिजांची उजळणी मी भरपूर करून घेई.