Categories
Baithak @ Classes Initiative Past Events

Violin Recital by Vidya Dengle at DSS Wadarwadi

“बैठक@क्लासेस” प्रकल्पांतर्गत श्रीमती विद्याताई डेंगळे व शिष्यांची व्हायोलिनवादन मैफल

दि. ९ ऑगस्ट २०१९, डोर स्टेप स्कूल्स,वडारवाडी, पुणे.

‘बैठक फाऊंडेशन’चे काम social media च्या माधमातून अनेक दिवस मी बघत होते. फार वेगळं, मूलभूत काम ही मंडळी करत आहेत हे त्यांच्या प्रत्येक post वरून लक्षात येत होते. ९ ऑगस्ट २०१९ रोजी ‘बैठक’ तर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला जायचा योग आला. श्रीमती विद्या डेंगळे व त्यांच्या शिष्यांचे व्हायोलीनवादन! हा कार्यक्रम डोर स्टेप स्कूल्स, वडारवाडी, पुणे येथे झाला.

२ खोल्या खाली व २ वर, अशा ४ छोट्या खोल्यांची जेव्हा शाळा होते तेव्हा विविध तक्ते, चित्रे अशा अनेक गोष्टींनी सजलेले अनुभव जागेचा छोटेपणा विसरायला लावतात. ही मैफलही मी अशीच अनुभवली! शास्त्रीय संगीताची मैफल म्हणलं की स्टेज ,ध्वनियोजना, प्रकाशयोजना,आसनव्यवस्था, दोन तानपूर्‍यांच्या साथीने कला सादर करणारे कलाकार असे प्रशस्त वातावरण डोळ्यांपुढे येते. या सर्व गोष्टी उत्तम असल्या तरच मैफल उत्तम रंगते असेही काही जणांचे मत असते. पण, जेव्हा संगीताशी जोडले जाण्याची इच्छा असते तेव्हा कलाकार,सूर-लय, आणि श्रोते, एवढेच महत्वाचे घटक उत्तम मैफल सजवतात हे मी अनुभवलेल्या ‘बैठक’ च्या या मैफलीबद्दल नक्कीच सांगू शकेन!

मैफलीच्या सुरूवातीला विद्याताईंची शिष्या वैष्णवी हिने वेळेनुरूप भीमपलास रागाने सुरुवात केली. तिने तीनताल मधील दोन रचना वाजवल्या. आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या वैष्णवीने आत्मविश्वासाने सादरीकरण केले. त्यानंतर श्री. ताहा हुसैन यांनी सादर केलेल्या हंसध्वनी रागाने प्रसन्न वाटले. ताहा यांनी देखील तीनताल मधे दोन गती पेश केल्या. मैफलीच्या शेवटी विद्याताईंनी वाजवलेल्या मेघ-मल्हार रागाने सुंदर सांगता झाली. विद्याताईंनी झपताल व तीनताल मधील रचना सादर केल्या, व जनसंमोहिनी रागातील दादरा गीतप्रकाराची झलक ऐकवली. गमक, ताना, तसेच खास व्हायोलीनचे तंत्र वापरून केलेला रागविस्तार ही त्यांच्या वादनातील काही ठळक वैशिष्ट्ये. या सर्व कलाकारांना प्रसाद कुलकर्णी यांनी तबल्याची समर्पक साथ केली.

या मैफलीत विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे पूर्णवेळ फक्त वादन न करता विद्याताई समोर बसलेल्या छोट्या श्रोत्यांशी संवाद साधत होत्या. सहा ते सोळा वयोगटातील जवळजवळ ३०-३५ मुले-मुली उपस्थित होते. वाजवल्या जाणार्‍या रागाचे स्वरूप कसे आहे, राग म्हणजे काय, व्हायोलीन कसे असते, ते कसे वाजते अशा अनेक गोष्टी सदरीकरणादरम्यान व नंतर विद्याताईंनी समजावून संगितल्या. श्रोते असलेल्या या लहान मुलांचे मला खूप कौतुक वाटले. अतिशय कुतुहलाने त्यांनी मैफल अनुभवली. त्यांनी पहिल्यांदाच अशी मैफल अनुभवली होती आणि त्याबद्दलचे अनेक प्रश्न, नवीन काही जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या डोळ्यांत दिसत होती.

एरवी ह्या मुलांपर्यंत पोहोचणारी गाणी किंवा संगीत हे फारच वेगळ्या स्वरूपाचे आहे हे लाक्षात आले. गणपती किंवा इतर मिरवणुकीत, सामाजिक साजर्‍या केल्या जाणार्‍या सण-वारांना जी कर्णकर्कश गाणी कानावर पडतात तोच त्यांचा संगीताशी आलेला संबंध! मात्र ‘बैठक’च्या या उपक्रमांतर्गत एक नवी आनंददायी वाट या छोट्या श्रोत्यांना सापडली असेल, व त्या वाटेवरून त्यांचा थोडा-फार प्रवास होईल, अशी खात्री वाटते. ‘बैठक’च्या या कार्यक्रमाचा अनुभव खूप छान व नेहमी स्मरणात राहील असा होता. संगीताची एक विद्यार्थिनी म्हणून मी ही या अनुभवातून खूप काही शिकले. ‘बैठक’ परिवारास माझ्या मनापासून शुभेच्छा!

– सौ. नेहा काटदरे-देशपांडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *